औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व / Importance of Industrial Management
Contents
- 1 औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व / Importance of Industrial Management
- 1.1 औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व खालील प्रमाणे आहेत।. ( Importance of Industrial Management )
- 1.2 १. उत्पादन साधनांचे अचूक संकलन (Accurate collection of production tools) :
- 1.3 २. वस्तू संशोधन व विकास :
- 1.4 ३. कर्मचारी नियुक्ती :
- 1.5 ४. कर्मचारी विकास :
- 1.6 ५. कर्मचारी – मालक – व्यवस्थापन संबंध दृढ :
- 1.7 ६. उत्पादन उद्दिष्टांची साध्यता :
- 1.8 ७. भांडवल उभारणी :
- 1.9 ८. संग्रहण व मालसाठा नियंत्रण :
- 1.10 ९. माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक :
- 1.11 १०. वस्तू व सेवांचे वितरण :
- 1.12 ११. यंत्ररचना :
- 1.13 १२. आदर्श कार्यवातावरण :
- 1.14 १३. गुणवत्ता नियंत्रण :
- 1.15 १४. व्यवसायाची कार्यक्षमता , उत्पादकता :
- 1.16
- 1.17 १५. व्यवसाय विस्तार व विकास :
- 1.18 १६. ग्राहक समाधान :
- 1.19 १७. समाजकल्याण :
- 1.20 १८. राष्ट्रविकास :
- 1.21
- 1.22 १९ . उद्योगसंस्थेच्या पूर्वनिर्धारित उद्देशांची पूर्तता :
- 1.23 २०. औद्योगिक शांतता :
- 1.24 २१. बाह्य घटकांचे हितसंवर्धन :
औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगक्षेत्रामध्ये हळूहळू व्यवस्थापनाचा अवलंब केला जाऊ लागला. याच काळात उद्योगक्षेत्राबरोबर व्यवस्थापनशास्त्राचाही हळूहळू विकास होत होता.
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते १ ९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत उद्योग क्षेत्रामध्ये परंपरागत व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला जात होता. १ ९ व्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात रॉबर्ट ओवेन, चार्लस बॅबेज, हेन्री टौने यांसारख्या विचारवंतांनी व्यवस्थापनाबाबत शास्त्रीय विचारांची मांडणी केली. फ्रेडरिक टेलर यांनी सर्वप्रथम व्यवस्थित व विस्तृत स्वरूपात शास्त्रीय व्यवस्थापनाच्या सिद्धांताची मांडणी केली. शास्त्रीय व्यवस्थापनाचे महत्त्व उद्योगजगताला पटल्यामुळे शास्त्रीय व्यवस्थापनाचा उद्योगक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवलंब केला जाऊ लागला.
जवळजवळ १ ९ ३० – १ ९ ४० पर्यंत उद्योगक्षेत्रावर शास्त्रीय व्यवस्थापनाचा प्रभाव होता. या काळात विविध व्यवस्थापन विचारवंतांनी उद्योगसंस्थेतील मानवी घटकांचे महत्त्व विशद केले. यानंतरच्या काळात उद्योगसंस्थेतील मानवी घटकाचे, मानवी संबंधाचे महत्त्व वाढत गेले. व्यवस्थापनाला मानवी, सामाजिक दृष्टिकोण दिला गेला. १ ९ ६० नंतर जपानी व्यवस्थापन पद्धतीचे महत्त्व वाढत गेले. अनेक विचारवंतांनी व्यवस्थापनाबाबत अनेक आधुनिक विचारांची, संकल्पनांची मांडणी केली. उदा. व्यूहरचनात्मक व्यवस्थापन, झेड सिद्धांत, उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापन, समग्र गुणवत्ता व्यवस्थापन, स्पर्धात्मक लाभ, तणाव व्यवस्थापन इत्यादी २१ व्या शतकामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान झाल्याने जागतिक पर्यावरणात यशस्वी होण्यासाठी उद्योगसंस्था अतिशय सखोलपणे आधुनिक व्यवस्थापन संकल्पनांचा, तंत्राचा, पद्धतींचा अवलंब करू लागल्या. उद्योगक्षेत्राचे व्यवस्थापन आधुनिक आवश्यक त्या पद्धतींनी, सिद्धांतांनी केले जाऊ लागल्याने उद्योगक्षेत्राचा सर्वोच्च विकास झाला. औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचा उद्योगक्षेत्रामध्ये अवलंब करणे होय. प्रभावी औद्योगिक व्यवस्थापनाचे लाभ, महत्त्व खालील मुद्द्यांच्या आधारे विशद केले जाते.
औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व खालील प्रमाणे आहेत।. ( Importance of Industrial Management )
१. उत्पादन साधनांचे अचूक संकलन
२. वस्तू संशोधन व विकास
३. कर्मचारी नियुक्ती
४. कर्मचारी विकास
५. कर्मचारी – मालक – व्यवस्थापन संबंध दृढ
६. उत्पादन उद्दिष्टांची साध्यता
७. भांडवल उभारणी
८. संग्रहण व मालसाठा नियंत्रण
९. माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक
१०. वस्तू व सेवांचे वितरण
११. यंत्ररचना
१२. आदर्श कार्यवातावरण
१३. गुणवत्ता नियंत्रण
१४. व्यवसायाची कार्यक्षमता , उत्पादकता
१५. व्यवसाय विस्तार व विकास
१६. ग्राहक समाधान
१७. समाजकल्याण
१८. राष्ट्रविकास
१९ . उद्योगसंस्थेच्या पूर्वनिर्धारित उद्देशांची पूर्तता
२०. औद्योगिक शांतता
२१. बाह्य घटकांचे हितसंवर्धन
१. उत्पादन साधनांचे अचूक संकलन (Accurate collection of production tools) :
उत्पादन क्रियेला प्रारंभ करण्यापूर्वी उत्पादन साधनसामग्रीचे अचूक संकलन करावे लागते. उदा. विविध प्रकारचा कच्चा माल, यंत्रसामग्री, हत्यारे, उपकरणे, जमीन, इमारत, ऊर्जासाधने इत्यादी. या सर्व घटकांची खरेदी योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य किमतीस, योग्य दर्जात करावी लागते. खरेदी क्रियेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन केल्यास शास्त्रीय खरेदीचे लाभ उद्योग संघटनेस प्राप्त होतात. थोडक्यात, प्रभावी खरेदी व्यवस्थापनामुळे उत्पादन साधनांचे अचूक संकलन करून एकूण उत्पादन खर्चामध्ये बचत करता येते.
२. वस्तू संशोधन व विकास :
ग्राहकांच्या अपेक्षा, आकांक्षा, आवडीनिवडी सतत बदलत असतात. ग्राहकवर्ग नेहमी नवनचीन वस्तूंकडे आकर्षित होत असतो. बदलत्या फॅशनप्रमाणे ग्राहकांच्या मागणीमध्येही बदल होतो. यामुळे उद्योजकांना वस्तू संशोधन व विकासाची प्रक्रिया अविरत सुरू ठेवावी लागते. वस्तू संशोधनामध्ये पूर्णतः नवीन वस्तूचा शोध घेणे किंवा वस्तूच्या विविध गुणविशेषांपैकी एका किंवा काही गुणविशेषांमध्ये बदल करणे अभिप्रेत आहे, तर वस्तू विकासामध्ये वस्तू संशोधनाला मूर्त स्वरूप देणे व वस्तूची उपयुक्तता वाढविण्यासाठी वस्तूच्या गुणवत्तेमध्ये सतत सुधारणा करणे अभिप्रेत आहे. व्यवस्थापनशास्त्राच्या मदतीने वस्तू संशोधन व विकासकार्य केल्यास या कार्याची अचूकता वाढते.
३. कर्मचारी नियुक्ती :
आधुनिक युगात व्यवसायातील मानवी घटकास अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. कर्मचाऱ्यांना व्यवसायाचे एक महत्त्वाचे संसाधन समजले जाते. कर्मचाऱ्यांच्या सहकार्यावर व निष्ठेवर संघटनेचे यश अवलंबून असते, याची सर्व घटकांना जाणीव झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची भरती व निवड अतिशय काळजीपूर्वक व विचारपूर्वक करावी लागते. उद्योजक कर्मचारी भरती व निवडीच्या क्रियेचे अचूक नियोजन, संघटन, निर्देशन व नियंत्रण करून व्यवसाय संस्थेस योग्य व पात्र कर्मचारी प्राप्त करू शकतात.
४. कर्मचारी विकास :
कर्मचारी विकासातून व्यवसाय विकास या तत्त्वाचे महत्त्व उद्योजकांना पटले आहे. यामुळे ते व्यवस्थापनाच्या माध्यमातून कर्मचारी विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेले दिसतात. उदा. व्यवस्थापनाच्या व निर्णयाच्या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना सहभाग, सतत कार्यप्रोत्साहन, कर्मचाऱ्यांना विचार व मतस्वातंत्र्य, अधिकार प्रदान, प्रभावी व गतिमान नेतृत्व इत्यादी कर्मचारी घटकाचे प्रभावी व्यवस्थापन केल्यामुळे कर्मचारी विकासास चालना मिळते. कर्मचाऱ्यांना कार्य व मानसिक समाधान लाभल्याने ते संघटनेला पूर्ण सहकार्य व निष्ठा बहाल करतात.
५. कर्मचारी – मालक – व्यवस्थापन संबंध दृढ :
कर्मचारी , मालक व व्यवस्थापन हे उद्योगसंस्थेतील तीन प्रमुख मूलभूत घटक आहेत . या तिघांमध्ये विश्वास , सहकार्य व सामंजस्य असेल तर उद्योगसंस्था यशस्वी होते . कर्मचारी व मालक यांच्यात सख्य व सलोखा प्रस्थापित करणे हे व्यवस्थापनाचे एक प्रमुख कार्य आहे . व्यवस्थापनाने आपल्या व्यवस्थापन कौशल्याचा व अनुभवाचा उपयोग करून या दोन घटकांत एकरूपता साधून त्यांची शक्ती संस्थेच्या यशात परावर्तित केली पाहिजे.
६. उत्पादन उद्दिष्टांची साध्यता :
उत्पादनाचे उद्दिष्ट किमान साधनांत, प्रयत्नात, खर्चात साध्य करणे हे प्रत्येक उपक्रमाचे अंतिम ध्येय असते. उत्पादन क्रिया कार्यक्षमतेने व परिणामकारकतेने पूर्ण झाल्यास उत्पादनाचे उद्दिष्ट सहज साध्य होते. प्रभावी व शास्त्रशुद्ध उत्पादन व्यवस्थापनामुळे उत्पादन साधनांचे अचूक संकलन, उत्पादन क्रियेचे अचूक नियोजन, उत्पादन उपविभागांमध्ये अचूक समन्वय, उत्पादन समस्यांविरुद्ध अचूक निर्णय, उत्पादन कार्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
७. भांडवल उभारणी :
भांडवल उभारणी हे उद्योगसंस्थेचे एक प्राथमिक व मूलभूत कार्य आहे. उद्योगाचे स्वप्न, कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी पुरेशा भांडवलाची आवश्यकता असते. आवश्यकतेइतकेच भांडवल किमान खर्चात संपादन करण्यासाठी आर्थिक योजना आखावी लागते. भांडवलाचे अचूक व्यवस्थापन केल्यामुळे आर्थिक योजनेला निश्चित यश प्राप्त होते. भांडवली गरजेचा अंदाज, भांडवल उभारणीच्या मार्गाची निवड, भांडवल रचना, भांडवलाचे प्रबंधन ही सर्व कार्ये प्रभावी वित्त व्यवस्थापनामुळे कार्यक्षमतेने पूर्ण होतात.
८. संग्रहण व मालसाठा नियंत्रण :
उत्पादन संस्थेचे आर्थिक यश बऱ्याच अंशी कार्यक्षम संग्रहण व मालसाठा नियंत्रणावर आधारित असते. संग्रहण व्यवस्थापनामुळे साधनसामग्रीचे सुरक्षित जतन, मालाची भौतिक मोजणी, अचूक माल हाताळणी, मालाचे वर्गीकरण व सांकेतिकीकरण व मालाचे हिशेब लेखन ही सर्व कार्ये अचूकपणे पार पडतात. तसेच मालसाठा व्यवस्थापनामुळे मालसाठा पर्याप्त पातळीस राखणे, मालसाठ्याचे सुरक्षित जतन व पुरवठा, मालसाठा मोजणी, मालसाठा किंमतनिश्चिती ही सर्व कार्ये कार्यक्षमतेने पूर्ण होतात. थोडक्यात, संग्रहण व मालसाठा कार्याचे अचूक नियोजन, संघटन, निर्देशन व नियंत्रण केल्यामुळे उत्पादन खर्चात बरीच बचत होते.
९. माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक :
उद्योगसंस्थेमध्ये कच्चा माल, हत्यारे व उपकरणांची माल हाताळणी व अंतर्गत वाहतूक नियमित करावी लागते. ही दोन्ही कार्ये कार्यक्षमतेने केल्यास साधनसामग्रीचा अपव्यय, नासधूस होत नाही. अचूक माल हाताळणी व सुरक्षित अंतर्गत वाहतुकीसाठी या दोन्ही कार्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते.
१०. वस्तू व सेवांचे वितरण :
आधुनिक युगात वस्तू व सेवांच्या वितरण क्रियेस उत्पादन क्रियेपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे . वाढत्या स्पर्धेमुळे वितरण सेवेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे . यामुळे वितरण कार्याचे प्रभावी व्यवस्थापन करावे लागते .
विक्रयवृद्धी , ग्राहकवृद्धी , बाजारपेठ व लाभवृद्धी अशा विविध उद्दिष्टांची साध्यता कार्यक्षम वितरण व्यवस्थापनावर आधारित असते . जाहिरात , प्रत्यक्ष विक्री , विक्रीपश्चात सेवा , बाजारपेठ संशोधन , वाटपमार्ग – मध्यस्थांची निवड , ग्राहक संपर्क इत्यादी कार्ये आधुनिक व्यवस्थापनाच्या तंत्राच्या , शैल्यांच्या साहाय्याने पार पाडल्यास अंतिम वितरण कार्यास कार्यक्षमता प्राप्त होते .
११. यंत्ररचना :
व्यावसायीन कार्ये कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रे , हत्यारे , उपकरणे , सेवाकेंद्रे , कार्यकेंद्रे इत्यादींची योग्य जागी मांडणी करणे म्हणजे यंत्ररचना होय . योग्य व शास्त्रीय रचनेमुळे कार्यप्रवाहास योग्य दिशा , गती व सातत्य प्राप्त होते . यंत्ररचनेबाबत अचूक पूर्वानुमान व नियोजन केल्यास , अचूक निर्णय घेतल्यास व यंत्ररचनेचे प्रभावी नियंत्रण केल्यास यंत्ररचना आदर्श होते . थोडक्यात , यंत्ररचनेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे .
१२. आदर्श कार्यवातावरण :
उत्पादन स्थळावरील कार्यपरिस्थिती व कार्यवातावरण उत्साहवर्धक व आरोग्यदायक असले पाहिजे . कामगारांचे कार्यसमाधान , कार्यक्षमता पर्यायाने संघटनेची कार्यक्षमता योग्य कार्यस्थितीवर अवलंबून असते . व्यवस्थापनाने कार्यपरिस्थितीमधील सर्व घटकांचे अचूक नियोजन , संघटन , समन्वय व नियंत्रण केले पाहिजे . व्यवस्थापनाने कार्यवातावरणातील सर्व घटकांबाबत अचूक निर्णय घेऊन कार्यवातावरण सुरक्षित बनविले पाहिजे .
१३. गुणवत्ता नियंत्रण :
आधुनिक युगामध्ये वस्तू व सेवांच्या गुणवत्तेला विशेष स्थान आहे . जागतिक बाजारपेठेमध्ये वस्तूच्या गुणवत्तेला सर्वोच्च महत्त्व दिले जाते . सद्यःस्थितीत गुणवत्ता व्यवस्थापनाची जागा समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाने घेतलेली आहे . व्यवसायातील सर्व घटकांनी समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत भाग घेतल्यास व्यवसायाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होते . अंतिम वस्तू व सेवांच्या सर्वोच्च गुणवत्तेसाठी समग्र गुणवत्ता व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे .
१४. व्यवसायाची कार्यक्षमता , उत्पादकता :
व्यवसायाची कार्यक्षमता व उत्पादकता ही बऱ्याच अंशी आधुनिक व्यवस्थापन पद्धती व तंत्रावर आधारित असते . व्यावसायीन कार्यांचे अचूक नियोजन , संघटन , निर्देशन व नियंत्रण केल्याने अचूक निर्णय प्रक्रियेमुळे , विविध विभागांतील योग्य समन्वयामुळे , जलद संदेशवहनामुळे व गतिमान नेतृत्वामुळे त्यांची कार्यक्षमता , उत्पादकता उंचावते . परिणामतः व्यवसायाची कार्यक्षमता व उत्पादकताही उंचावते.
१५. व्यवसाय विस्तार व विकास :
प्रभावी व्यवस्थापन हे व्यवसाय विस्तार व विकासाचे एक मूलभूत साधन आहे . आधुनिक व्यवस्थापन विचारांचा , संकल्पनांचा अवलंब करून उत्पादन साधनांचा कमाल वापर व उत्पादन खर्चात बचत करणे शक्य होते . उदा , व्यूहरचनात्मक व्यवस्थापन , उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापन इत्यादी . थोडक्यात , कुशल व्यवस्थापनामुळे व्यवसायाच्या लाभक्षमतेची वृद्धी होते . पर्यायाने व्यवसायाचा विस्तार व विकास होतो .
१६. ग्राहक समाधान :
ग्राहक समाधानावर ग्राहकांचा पाठिंबा , सहकार्य व निष्ठा आधारित असते . व्यवसायाने ग्राहकहिताचा विचार केल्यास ग्राहकही व्यवसायहिताचा विचार करतात , ग्राहकांना रास्त किमतीत , दर्जेदार , आवश्यक त्या प्रमाणात वस्तू व सेवांचा पुरवठा केल्यास ग्राहकांना सुखसमाधान प्राप्त होते . उत्पादन व वितरण कार्याच्या अचूक नियोजन व नियंत्रणामुळे वस्तू व सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होऊन उत्पादन खर्चात घट होते . आधुनिक व्यवस्थापन ग्राहकांशी सतत संपर्क साधून त्यांच्या अपेक्षा , इच्छा जाणून घेते व त्यानुसार आपल्या उत्पादन व वितरण धोरणात योग्य ते बदल करते . यामुळे ग्राहक सुखी बनतात .
१७. समाजकल्याण :
आधुनिक व्यवस्थापनाकडे सामाजिक दृष्टिकोण असल्याने ते समाजहिताचा , कल्याणाचा प्राधान्याने विचार करते . नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर , रोजगारवाढीस चालना , यंत्र व श्रमशक्तीचा महत्तम उपयोग , योग्य व्यापारी प्रथांचा अवलंब , औद्योगिक शांतता प्रस्थापनेसाठी प्रयत्न अशा विविध सकारात्मक कृतींमुळे समाजकल्याण , उन्नती शक्य होते . थोडक्यात , आधुनिक व गतिमान व्यवस्थापन व्यवसायाचा कारभार कार्यक्षमतेने चालवून समाजविकासाला चालना देतात.
१८. राष्ट्रविकास :
देशातील उद्योगक्षेत्रामध्ये आधुनिक व्यवस्थापन पद्धती , तत्त्वांचा अवलंब केल्यास उद्योगक्षेत्राचा विस्तार व विकास होतो . कुशल व्यवस्थापकांमुळे देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा , मनुष्यबळाचा सुयोग्य व परिपूर्ण वापर होतो . उद्योगक्षेत्राच्या विकासामुळे रोजगारवाढीस चालना मिळते . वस्तू व सेवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे लोकांच्या राहणीमानांचा स्तर उंचावतो . प्रभावी व्यवस्थापनामुळे उद्योगक्षेत्राचा विकास झाल्याने राष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळते . राष्ट्रीय उत्पादनात व उत्पन्नात वाढ होते .
१९ . उद्योगसंस्थेच्या पूर्वनिर्धारित उद्देशांची पूर्तता :
उद्योगसंस्थेचे व्यवस्थापन कुशल व बुद्धिमान व्यवस्थापकांच्या हाती असेल तर ते अचूकपणे कर्मचाऱ्यांच्या कार्यांचे व प्रयत्नांचे नियोजन , संघटन , निर्देशन व नियंत्रण करतात . यामुळे कार्यप्रवाहास योग्य दिशा व गती प्राप्त होऊन कार्यांची कार्यक्षमता उंचावते . उद्योगसंस्थेच्या पूर्वनिर्धारित उद्देशांची पूर्तता होते व तिला आर्थिक स्थैर्य लाभते .
२०. औद्योगिक शांतता :
व्यवस्थापनाला मानवी दृष्टिकोण देण्याचे मौलिक कार्य एल्टन मेयो यांनी केले आहे . आधुनिक व्यवस्थापन विचारवंतांनी व्यवसाय संस्थेतील मानवी घटकाचे महत्त्व विविध प्रकारे विशद केले आहे . आधुनिक व्यवस्थापन कर्मचारी समाधानासाठी व विकासासाठी सतत प्रयत्नशील असते . या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या सेवा – सुविधा पुरविल्या जातात . यामुळे कामगार – व्यवस्थापन – मालक यांच्यात स्नेह व सलोखा वृद्धिंगत होतो . कामगारांना पूर्ण कार्य , मानसिक , आर्थिक समाधान लाभते . यामुळे उद्योगक्षेत्रात औद्योगिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत होते .
२१. बाह्य घटकांचे हितसंवर्धन :
उद्योगसंस्थेमध्ये उत्पादन व वितरण या दोन मूलभूत क्रिया पार पाडल्या जातात . परंतु , या क्रिया कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी समाजातील विविध व्यक्ती घटकांची , संस्थांची मदत घ्यावी लागते . उदा . पुरवठादार , आनुषंगिक सेवा पुरविणाऱ्या संस्था , वितरण क्रियेत सहभागी होणारे मध्यस्थ , शासन , स्थानिक स्वराज्य संस्था , सामाजिक संस्था इत्यादी . या संस्थांचे आर्थिक हितसंबंध उद्योगसंस्थेमध्ये गुंतलेले असतात . उद्योगसंस्थेचे कुशल नेतृत्व प्रशिक्षित व्यवस्थापक वर्ग करीत असेल , तर ते सामाजिक हिताचे भान ठेवून योजना व धोरणांची आखणी करतात . यामुळे आपोआप विविध सामाजिक घटकांचे हितसंरक्षण व हितसंवर्धन होते .
याशिवाय , उद्योगक्षेत्राचे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने , तंत्राने केले जात असेल , तर त्याचे अनेक लाभ संबंधित उद्योगसंस्थेला , उद्योगक्षेत्राला , सामाजिक घटकांना व राष्ट्राला प्राप्त होतात . उदा . व्यवसाय पर्यावरणातील प्रतिकूल घटकांवर यशस्वी मात , तर अनुकूल घटकांचा प्रभावी उपयोग , आधुनिक तंत्रज्ञानाचा सहज अवलंब , जागतिक स्पर्धेवर मात , उत्पादन साधनांमध्ये अचूक समन्वय , जलद राष्ट्रविकास , निर्यातवृद्धी , राष्ट्राच्या संपन्नतेत व समृद्धीत वाढ इत्यादी .
Related Article
28 बिझिनेस IDEA IN MARATHI | SMALL BUSINESS IDEAS IN MARATHI
Small Business Ideas In Marathi For Ladies (महिलांनसाठी / Housewife)
ग्रामीण भागातील व्यवसाय संधी | खेडेगावातील व्यवसाय village business ideas in Marathi