बदलत्या पर्यावरणातील आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व

बदलत्या पर्यावरणातील आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व ( The importance of modern management in a changing environment)

    व्यवसायाचे यश, अस्तित्व, भरभराट या सर्व बाबी व्यवस्थापनावर अवलंबून आहेत. म्हणजेच व्यवस्थापन बदलणाऱ्या पर्यावरणाशी कसे जुळवून घेते यावर व्यवसायाचे भवितव्य, अस्तित्व व विकास अवलंबून आहे. या दृष्टीने आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल, 

बदलत्या पर्यावरणातील आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व

१. साधनसामग्रीचा काटकसरीने वापर

२. तंत्रज्ञानातील बदल

३. तीव्र स्पर्धा

४. गतिमान नेतृत्वाची गरज

५. बदलांची आव्हाने पेलणे

६. कर्मचारी समस्यांची सोडवणूक

७. बहुउद्दिष्टात समतोल 

८. ग्राहक सेवेला महत्त्व

९. माहिती तंत्रज्ञान

१०. ज्ञानाधिष्ठित समाज

 

१.साधनसामग्रीचा काटकसरीने वापर :

 आजच्या बदलत्या पर्यावरणामध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा काटकसरीने वापर करणे महत्त्वाचे आहे. भूतकाळाच्या तुलनेत भविष्यकाळात साधनसामग्रीचा मोठा तुटवडा भासणार आहे. वाढती लोकसंख्या, भौतिक सुखाची लालसा त्यामुळे भविष्यात साधनसामग्रीचा मोठा तुटवडा निर्माण होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध जमीन, श्रम, भांडवल व संघटन या साधनांचा योग्य पद्धतीने व काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर पडते. आधुनिक व्यवस्थापन कोणत्या साधनांचा कसा वापर करावा याचा योग्य विचार करते. व्यवसायाची उद्दिष्टे गाठण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रींचे काटकसरीने वापर करण्याचे कौशल्य आधुनिक व्यवस्थापनाकडे असते. या दृष्टीने आधुनिक व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे.

 

२. तंत्रज्ञानातील बदल :

 आजचे तंत्रज्ञान केव्हा जुने होईल हे सांगता येत नाही. नवनवीन तंत्रज्ञानात सतत भर पडत असल्याने अतिशय वेगाने बदल होत आहेत. उदाहरणार्थ : मोबाईल, टी. व्ही., लॅपटॉप, टॅब अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांना तंत्रज्ञानातील बदलांना तोंड द्यावे लागते. आजच्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान वापरले तरच यशस्वी होता येते अशा परिस्थितीत व्यवसायाची उत्पादकता व नफा वाढविण्यासाठी शास्त्रीय शोधांचा व नवीन तंत्रांचा योग्य पद्धतीने विचार करण्याची जबाबदारी शेवटी आधुनिक व्यवस्थापनावर पडते. 

 ३. तीव्र स्पर्धा : 

व्यवसायाचे अस्तित्व टिकविण्यासाठी तीव्र गळेकापू स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता व्यवसायामध्ये असली पाहिजे. स्पर्धात्मक किंमत, त्याचप्रमाणे उत्तम दर्जाची वस्तू असेल तरच स्पर्धेत टिकाव लागतो. अर्थात, उत्तम दर्जाची वस्तू निर्माण करण्यासाठी व स्पर्धात्मक किमतीत सातत्य राखण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन महत्त्वाचे कार्य करते. आधुनिक व्यवस्थापन आपल्या आदर्श नियोजनाद्वारे तसेच कार्यक्षम निर्देशनाद्वारे हे साधू शकते. 

४. गतिमान नेतृत्वाची आवश्यकता : 

नेतृत्व करणे म्हणजे दिशा दाखवणे, मार्गदर्शन करणे. आधुनिक व्यवस्थापन हे गतिमान नेतृत्व देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. कर्मचाऱ्यांचा कृतिशील प्रतिसाद व सहकार्य मिळविण्यासाठी कार्यक्षम नेतृत्वाची गरज असते. आजच्या स्पर्धायुक्त जगात नेतृत्व हे गतिमान असले पाहिजे. आधुनिक व्यवस्थापन हेच गतिमान नेतृत्व देऊ शकते. अशा प्रकारे आधुनिक व्यवसायाला गतिमान नेतृत्वाची गरज असल्याने आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व वाढते.

 

५. बदलांची आव्हाने पेलणे : 

सततच्या वेगवान बदलांमुळे पर्यावरणाचे स्वरूप अस्थिर बनले आहे. जागतिकीकरणाच्या लाटेमुळे व्यापार, उद्योगक्षेत्रांत अनेक नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. जागतिकीकरणामुळे जगात कोठेही घडणाऱ्या घटनेचे परिणाम संपूर्ण जगभर पसरतात. प्रगत विज्ञान व नव्या तंत्रज्ञानामुळे व्यवसाय क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडून येत आहेत. अशा बदलांची आव्हाने पेलण्यासाठी सक्षम, धंदेवाईक व्यवस्थापनाची गरज आहे आणि ही गरज आधुनिक व्यवस्थापनामुळे भरून निघते. बदलाची आव्हाने पेलण्यामुळे व्यवसायांचे अस्तित्व धोक्यात येत नाही. त्यामुळे ज्या व्यवसाय संघटनाकडे सक्षम, कुशल, धंदेवाईक व आधुनिक व्यवस्थापन आहे त्यांचे अस्तित्व टिकून आहे.

६. कर्मचारी समस्यांची सोडवणूक : 

उत्पादनाचे जे अनेक घटक आहेत उदा. जमीन, इमारत, यंत्रसामग्री, भांडवल व कर्मचारी. त्यातील कर्मचारी/श्रम हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. तो सजीव घटक आहे. कर्मचाऱ्यांना हाताळणे ही आधुनिक व्यवस्थापनाची खरी कसोटी आहे. व्यवसायाची उद्दिष्टे यासाठी व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण करणे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न कौशल्याने हाताळणे, त्यांना कार्यप्रेरणा देणे, कर्मचारी हा सजीव घटक असल्याने त्याला मानवी वागणूक देणे, कर्मचाऱ्यांच्या समाधानात सतत भर टाकणे कारण कर्मचारी समाधानी असेल तरच उद्योग संस्था आपले अंतिम उद्दिष्टे गाठते. अशा प्रकारची कार्ये व्यवस्थापनाला करावी लागतात. त्यामुळे कर्मचारी/श्रम या घटकाच्या समस्यांची सोडवणूक समाधानकारक करणे गरजेचे असते. समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी आधुनिक व्यवस्थापनाची आधुनिक व्यवस्थापन पद्धतीतील योगदान ते थोडक्यात, कर्मचाऱ्यांच्या समस्यांची समाधानकारक सोडवणूक करण्याच्या दृष्टीने आधुनिक व्यवस्थापनाला महत्त्वाचे उच्च स्थान आहे. 

७. बहउहिष्टात समतोल साधणे : 

पूर्वीच्या काळी उद्योग व्यवसायाचे एकमेव धि होते. ते म्हणजे नफा मिळविणे. आधुनिक जगात उद्योग व्यवसायाला केवळ नफा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चालत नाही तर त्याबरोबर इतर अनेक उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रय्न करावे लागतात. म्हणजेच नफा या आर्थिक उद्दिष्टाबरोबर सामाजिक उद्दिष्टे तितकीच महत्त्वाची झाली आहेत. भागधारक, कर्मचारी, ग्राहक, पुरवठादार समाज

आणि हितसंबंध गुंतलेल्या सर्वांचे संतुलित हितरक्षण करण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर आहे. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक या दोन्ही प्रकारच्या उद्दिष्टात समतोल साधण्याची मोठी जबाबदारी व्यवस्थापनावर आहे. आधुनिक व्यवस्थापनाकडे या दोन्ही उद्दिष्टात समतोल साधण्याची शक्ती असते. 

८. ग्राहक सेवेला महत्त्व : 

स्पर्धेच्या युगात ग्राहक सेवेला फारच महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे नवीन उत्पादन विकास करणाऱ्या कंपनीला आपला बाजारातील हिस्सा टिकऊन ठेवण्यासाठी उच्च दर्जाची ग्राहक सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करणे, उत्पादन कार्याइतकेच गरजेचे ठरत आहे. उच्च दर्जाची ग्राहक सेवा म्हणजे नेमकी कशा प्रकारची सेवा हवी आहे हे अगोदर ओळखणे महत्त्वाचे ठरत आहे.

      त्यासाठी पद्धतशीर संशोधनाची गरज निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांना आपल्या ग्राहक सेवेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून त्यात सुधारणा करणे महत्त्वाचे झाले आहे या दृष्टीने आधुनिक व्यवस्थापनाला महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. 

 ९. माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्व : 

    माहिती तंत्रज्ञान आज प्रचंड वेगाने विकसित होत आहे. सर्व प्रकारच्या व्यवस्थापनामध्ये माहितीचे व्यवस्थापन याला दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त होत आहे. आपली उत्पादने, आपले ग्राहक, बाजारपेठ स्पर्धक, बाजारपेठेतील आपल्या कंपनीचा हिस्सा, त्या दृष्टीने स्वत:ची कामगिरी हे सर्व नीट समजावून घेण्यासाठी योग्य माहितीची आवश्यकता भासत आहे. इंटरनेटमुळे माहितीचे विशाल महामार्ग उपलब्ध झाले आहेत. सर्व प्रकारचे ज्ञान माहितीमध्ये रूपांतरित केले जात आहे. त्यामुळे माहितीची विशाल महाभंडारे निर्माण होत आहेत व त्यातून माहितीची विशाल महाजाळी तयार केली जात आहेत. साहजिकच, कारखान्यातील आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळ आमूलाग्र बदल होत आहे. संपूर्ण समाज माहिती अधिष्ठान बनत चालला आहे. त्यामुळे व्यवस्थापनाचे तंत्र बदलत आहे. अशा वेगाने बदलणाऱ्या पर्यावरणात आधुनिक व्यवस्थापनाची कामगिरी महत्त्वाची ठरत आहे. 

१०. ज्ञानाधिष्ठित समाज : 

बदलणाऱ्या पर्यावरणामध्ये शारीरिक श्रम व कौशल्यापेक्षा ज्ञानाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे आणि भविष्यात ज्ञानाचे महत्त्व सतत वाढणारच आहे. 

   ज्ञानाचा योग्य उपयोग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. आजच्या स्पर्धायुक्त जगात खंबीरपणे उभे राहण्यासाठी ज्ञानाचा उपयोग वाढत्या प्रमाणात होणार आहे. बाजारपेठ संशोधन, नवनिर्मिती, दर्जात वाढ, खर्चात बचत, ग्राहक सेवा इत्यादी विविध गोष्टींबाबत ज्ञान मिळविणे, ते अद्ययावत ठेवणे, त्याचा योग्य वेळेत वापर करणे या गोष्टींना फारच महत्त्व येत आहे. त्यामुळे साहजिकच, या सर्व गोष्टी केवळ कल्पक आधुनिक व्यवस्थापनच करू शकते.

Leave a Comment